पिंपरीमध्ये अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर गुन्हा दाखल

पिंपरीमध्ये अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर गुन्हा दाखल
Share

पिंपरी- पिंपरीतील मासुळकर कॉलनी परिसरात विनापरवाना आणि नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरवर संत तुकाराम नगर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी तीन नेपाळी तरुणांसह एकूण चार जणांवर संत तुकाराम नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुन जिबहाद्दूर कामी (वय २४), बिष्णु लालसिंग कठायत (वय २५), हुक्का सर्व्ह करणारा निर्प उर्फ निरंजन निंबहाद्दूर शाही (वय २६, सर्व रा. अजमेरा, पिंपरी; मूळ रा. नेपाळ) आणि हुक्का पार्लर मालक दीपिका कदम (रा. वाकड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर जैनक यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे अजमेरा रोड येथील एका गाळ्यात बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवत होते. या पार्लरमध्ये हुक्का पिण्यासाठी कोणताही स्वतंत्र किंवा कायदेशीर स्मोकिंग झोन तयार न करता ग्राहकांना हुक्का पुरवला जात होता. तसेच हुक्का पिताना तेथील विस्तव आणि बेजबाबदार पद्धतीमुळे ग्राहकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिसांनी मंगळवारी (६ ऑक्टोबर) पहाटे एक वाजताच्या सुमारास

कारवाई करत चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, संत तुकाराम नगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Vedh News