महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात मोठी कारवाई; ६ अधिकाऱ्यांचे निलंबन ; लाचखोरीच्या पुरावे समोर

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात मोठी कारवाई; ६ अधिकाऱ्यांचे निलंबन ; लाचखोरीच्या पुरावे समोर
Share

पुणे- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे कार्यालयातील सहा वरिष्ठ आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उद्योगांना उभारणीसाठी आणि संचालनासाठी परवानगी देताना कथित आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप सिद्ध झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारींसोबत आर्थिक व्यवहारांचे व्हिडिओ पुरावेही सादर करण्यात आल्याची माहिती आहे.

निलंबित अधिकाऱ्यांमध्ये प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे, उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, उपप्रादेशिक अधिकारी कार्तिकेय लंगोटे, क्षेत्रीय अधिकारी सुषमा कुंभार, क्षेत्रीय अधिकारी जयंत डोके आणि क्षेत्रीय अधिकारी अजय खामकर यांचा समावेश आहे.

उद्योगांच्या मंजुरी प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचे सांगत प्रशासनाने ते फेटाळून लावले.

कर्तव्यात कसूर आणि गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत सहाही अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीच्या अधीन राहून निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत या सर्व अधिकाऱ्यांचे मुख्यालय मुंबई येथील MPCB मुख्य कार्यालयात निश्चित करण्यात आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

Vedh News