सी जे पी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीला लष्करी छावणीचे स्वरूप, अभिजित दिपके, ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आज कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतर आंदोलनापूर्वी दिल्लीत बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. पोलिसांनी जंतर मंतर भवती एक सुरक्षा कवच तयार केले असून राजधानी दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरूप आलेले आहे. दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर येथील प्रस्तावित आंदोलनापूर्वी सी जे पी चे संस्थापक अभिजित दिपके आणि यु ट्युबर ध्रुव राठी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी बंदी झुगारून जंतर-मंतरकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी दिल्लीत कडक टाळेबंदी आणि सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. २३,००० पेक्षा जास्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (CAPF) जवान आणि जवळपास ३५,००० दिल्ली पोलीस कर्मचारी राजधानीत तैनात करण्यात आले आहेत. जंतर-मंतर, इंडिया गेट आणि लुटियन्स दिल्ली परिसराला बहुस्तरीय बॅरिकेडिंग (Multi-layer barricading) करून पूर्णपणे सील करण्यात आले आहे. सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि फेस रेकग्निशन सिस्टम (FRS) चा वापर केला जात आहे.
संपूर्ण नवी दिल्ली भागात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे (BNSS) कलम १६३ (पूर्वीचे कलम १४४) लागू करण्यात आले असून, जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर परिसरात आंदोलन होऊ नये यासाठी आदल्या रात्रीपासूनच मोठी सुरक्षा तैनात केली होती. CJP चे प्रमुख अभिजित दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना आणि आंदोलकांना दिल्लीत पोहोचताच किंवा विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले आहे. CJP च्या लीगल एड प्रमुख रत्ना सिंग यांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. इतर राज्यांमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही वाटेतच रोखले जात आहे.
सुरक्षा कारणास्तव राजीव चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट, पटेल चौक आणि आयटीओ यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांसह जवळपास ४५ ते ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश व निकास दरवाजे बंद करण्यात आले आहेत. दिल्लीत येणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या सकाळी ४ ते दुपारी २ या वेळेत रद्द करण्यात आल्या आहेत जेणेकरून आंदोलक दिल्लीत पोहोचू नयेत.
जंतर-मंतरच्या ४ किलोमीटरच्या परिसरात २४ तासांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा पूर्णपणे खंडित करण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्लीत आज आणि उद्या ‘ड्राय डे’ (दारूबंदी) जाहीर करण्यात आला आहे. दिल्ली-नोएडा, अप्सरा बॉर्डर आणि आया नगर बॉर्डरवर गाड्यांची कडक तपासणी केली जात असून दिल्लीत येणाऱ्या प्रमुख ३० पॉईंट्सवर ट्रॅफिक डायव्हर्शन करण्यात आले आहेत. CJP कडून आरोप करण्यात आला आहे की, आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुणे, तेलंगणा आणि इतर भागांतून दिल्लीकडे निघालेल्या शेकडो विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना मध्य प्रदेश (इटारसी स्टेशन) व इतर ठिकाणी वाटेतच थांबवून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजित दिपके म्हणाले , “देश कोणत्या दिशेने जात आहे हे तुम्ही पाहू शकता. आम्हाला विमानातच ताब्यात घेतले जात आहे, इंदिरा गांधींनीसुद्धा असे कधी केले नव्हते. ही हुकूमशाही आहे, पण आम्ही त्यांना घाबरत नाही. आम्ही अटकेसाठी तयार आहोत”






