आयटी अभियंत्याचा मृत्यू, दोन दिवस फ्लॅटमध्ये पडून होता मृतदेह… धक्कादायक कारण आले समोर

पुणे – पुण्यात एका ३० वर्षीय संगणक अभियंत्यांचा मृतदेह घरातील अंथरुणावर आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या अभियंत्याचा मृतदेह दोन दिवस फ्लॅटमध्येच पडून होता. दुर्गंधी येऊ लागल्यानंतर घरमालकाने दार उघडल्यानंतर पहिले असता त्याच्या मानेखाली इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग आढळून आली. ही घटना वडगाव शेरी मध्ये सोमनाथनगर येथे उघडकीस आली.
रोहन कुबडी (३० वर्षे) असे या संगणक अभियंत्याचे नाव आहे. मानदुखीपासून आराम मिळवण्यासाठी इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग प्लगला जोडून मानेखाली ठेवून तो झोपी गेला असता झोपेतच मानेखालच्या इलेक्ट्रिक उपकरणातून विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
रोहन हा गेल्या तीन महिन्यांपासून सोमनाथनगरमध्ये भाड्याच्या खोलीत एकटाच राहात होता. दोन दिवस खोलीचा दरवाजा उघडला नाही आणि आतून दुर्गंधी येऊ लागल्याने घरमालकाने पोलिसांना व दरवाजा उघडून पाहिले असता ही घटना समोर आली. खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने आणि फोनला प्रतिसाद न मिळाल्याने घरमालकाने दार उघडले, तेव्हा ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. झोपताना त्याच्या मानेखाली ठेवलेल्या इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅगमधून वीजप्रवाह आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, बॅगमध्ये तांत्रिक बिघाड होता की मृत्यूचे कारण वेगळेच आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर आणि उपकरणाच्या तपासणीनंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. चंदननगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.






