विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांबाबत सरकार सकारात्मक ; राज ठाकरे यांनी दिली एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांना महत्वाची माहिती

मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध मागण्यांसाठी पुण्यात गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांच्या नोकरी संदर्भात लवकरच एक चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. घेतली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.
राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यात एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि रास्त अपेक्षांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार, आज या विषयावर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
नोकरीसाठी स्वतःचा जिल्हा, तालुका, घर आणि कुटुंबापासून दूर राहून मेहनत करणाऱ्या तरुण-तरुणींची परिस्थिती पाहून वाईट वाटते, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्रीही सकारात्मक असल्याचे चर्चेतून जाणवल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या काही दिवसांत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच, विद्यार्थ्यांनी संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सस्नेह जय महाराष्ट्र,
५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं.स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते.
म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा.
राज ठाकरे ।
— Raj Thackeray (@RajThackeray) October 9, 2026






