मॉडिफाइड सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेट्सवर बुलडोझर, पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांची कारवाई

मॉडिफाइड सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेट्सवर बुलडोझर, पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांची कारवाई
Share

पिंपरी- रात्री अपरात्री फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांच्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कर्णकर्कश मॉडिफाइड सायलेन्सर आणि अनधिकृत फॅन्सी नंबर प्लेट जप्त केले. ४१५ मॉडिफाइड सायलेन्सर आणि ५९१ फॅन्सी नंबर प्लेट्सवर डांबरीकरणासाठी वापरण्यात येणार रोडरोलर चालवून पोलिसांनी नष्ट केले.

चालू वर्षातील पोलिसांची ही तिसरी मोठी कारवाई असून, कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, वृद्ध व गरोदर महिलांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये वाहनांची तपासणी करताना नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आलेले मॉडिफाइड सायलेन्सर, तसेच वाहनांच्या क्रमांकामध्ये फेरफार करणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट्स मोठ्या प्रमाणात आढळून आल्या होत्या.

वाहनचालकांनी शासनाच्या नियमांनुसारच नंबर प्लेट्सचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेषतः वाहनांवर ‘एचएसआरपी’ प्लेट बसविणं आवश्यक असून, नंबर प्लेटमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. असे बेकायदेशीर सायलेन्सर बसवून देणाऱ्या दुकानदार व मेकॅनिकवरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचं पालन करावे आणि वाहनांमध्ये कोणतेही बेकायदेशीर बदल करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Vedh News