पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ऑक्टोबरपासून दहा टक्के पाणी कपात

पिंपरी-पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांवर पाणी कपातीचे संकट उभे राहिले आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानात घट झाल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून जलसंपदा विभागाने १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला दिवसाला ७७० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता असताना ६६५ एमएलडीच पाणी पुरवठा केला जात आहे. त्यातही मागील सात वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने कमी दाबाने, अपुऱ्या पाण्याच्या तक्रारी कायम असताना आता आणखी पाणी कपात केली जाणार आहे. एल निनाेच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात माेठी घट झाल्याने पुढील वर्षभराचा विचार करता १६ ऑक्टोबरपासून दहा टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे. याबाबत जलसंपदा विभागाकडून महापालिकेला पत्र दिले जाणार आहे.
शहराला सद्यस्थितीत पवना धरणातून ५४०, आंद्रातून ९५ आणि एमआयडीसीकडून ३० असा ६६५ एमएलडी पाणी पुरवठा सुरू आहे. शहरात २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. या निर्णयाला पुढील महिन्यात सात वर्ष पूर्ण हाेतील. एल निनाेच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागात पर्जन्यमानात माेठी घट झाली आहे. असे असले तरी पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना आणि आंद्रा धरण शंभर टक्के भरले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबरपासून दहा टक्के पाणी कपात करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. या आदेशाची पिंपरी-चिंचवड शहरातही अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार महापालिकेसाठी पवना आणि आंद्रा धरणातून साेडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कपात हाेणार आहे.
पाण्याची तूट असल्याने नव्याने विकसित झालेल्या आणि टोलेजंग इमारती असलेल्या वाकड भागातील २०० ते ५०० सदनिका असलेल्या ३४ गृहनिर्माण साेसायट्यांना ५० टक्केच पाणी पुरवठा महापालिकेकडून केला जात आहे. त्यामुळे या सोसायट्यांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. शंभर टक्के पाणीपुरवठा करण्याची सोसायटीधारकांची मागणी आहे. परंतु, भामा-आसखेडचे पाणी आल्याशिवाय शंभर टक्के पाणी देता येणार नसल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.






