नेहरूनगर न्यायालय परिसरातील कोंडीवर अण्णासाहेब मगर स्टेडियम मधील मोकळ्या जागेचा पर्याय

नेहरूनगर न्यायालय परिसरातील कोंडीवर अण्णासाहेब मगर स्टेडियम मधील मोकळ्या जागेचा पर्याय 
Share

पिंपरी – नेहरूनगर न्यायालय परिसरातील अपुरी पार्किंग व्यवस्था, वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या दुतर्फा नोटरी व्यवसाय करणाऱ्या वकिलांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या आतील बाजूस उपलब्ध मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळाची व्यवस्था करण्यासह नोटरी व्यवसाय करणाऱ्या वकिलांसाठी स्वतंत्र, सुसज्ज जागा उपलब्ध करून देण्याच्या पर्यायाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

महापौर रवी लांडगे, क प्रभाग अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे आणि क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे-पाटील यांच्याकडे बार असोसिएशनने निवेदनाद्वारे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर क प्रभाग अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे आणि क क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे-पाटील यांनी अण्णासाहेब मगर स्टेडियम तसेच नेहरूनगर न्यायालय परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्टेडियमच्या आतील बाजूस पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच नोटरी व्यवसाय करणाऱ्या वकिलांसाठी प्रशस्त प्रवेशद्वारासह स्वतंत्र व सुसज्ज जागा निर्माण करण्याबाबत चर्चा झाली.

नेहरूनगर न्यायालयात सुमारे २ हजार नोंदणीकृत वकील असून दररोज सुमारे ३,५०० हून अधिक प्रकरणांचे कामकाज चालते. याशिवाय सुमारे २ हजार पक्षकार, नागरिक आणि पोलीस कर्मचारी विविध कामांसाठी न्यायालयात ये-जा करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणातील दैनंदिन वर्दळीच्या तुलनेत न्यायालयाच्या बेसमेंटमधील पार्किंगची उपलब्ध जागा अत्यंत अपुरी आहे. त्यातच बेसमेंटमध्ये पाणी साचण्याच्या समस्येमुळे उपलब्ध पार्किंग व्यवस्थेवरही मर्यादा येत आहेत.

परिणामी वकील, पक्षकार आणि नागरिकांना रस्त्यावर वाहने उभी करावी लागत असून, न्यायालय परिसरासह विठ्ठलनगर आणि लगतच्या भागात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. स्थानिक रहिवाशांनाही या कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, किरकोळ अपघातांच्या घटनांची शक्यताही वाढली आहे.

नोटरी व्यवसाय करणाऱ्या वकिलांनाही रस्त्याच्या दुतर्फा काम करावे लागत असल्याने पादचारी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पार्किंगसोबतच नोटरी वकिलांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे हा वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा उपाय ठरणार आहे.

पाहणीवेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे विद्यमान सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रिना मगदूम, माजी सचिव ॲड. धनंजय कोकणे, सदस्य ॲड. संकेत सरोदे, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड. विकास शर्मा त्याचबरोबर प्रभाग क्रमांक ९ मधील फारुख इनामदार, कमलेश वाळके, शंकर उबाळे यांच्यासह वकील बांधव व नागरिक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे सचिव ॲड. उमेश खंदारे म्हणाले, “वकील, पक्षकार आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी पार्किंग व नोटरीसाठी नियोजनबद्ध व्यवस्था होणे गरजेचे आहे. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्याची लवकर अंमलबजावणी व्हावी, ही अपेक्षा आहे “

Vedh News