अपघात नव्हे, खून ! लोणावळ्यातील अभय मराठे मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण ; कोणी केली हत्या ?

अपघात नव्हे, खून ! लोणावळ्यातील अभय मराठे मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण ; कोणी केली हत्या ?
Share

लोणावळा – घरातील परवानाधारक रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटून एका ३३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लोणावळ्यातील भुशी गावातील प्रसिद्ध ‘हॉटेल मोतीराम’ येथे घडली. हा अपघात नसून खून असल्याचे आता पोलीस तपासातून समोर आल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. आजोबानेच प्रॉपर्टीच्या वादातून आपल्या नातवाची गोळी झाडून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

अभय माणिक मराठे (वय ३३) हे हॉटेलच्या आवारात त्यांच्या वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करत होते. रायफल साफ करत असताना अचानक ट्रिगर दाबला गेल्याने त्यातून थेट गोळी सुटून थेट अभयच्या छातीत घुसली. गोळीचा आवाज होताच अभय रक्ताच्या थारोळ्यात पडला. बंदुकीचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी आणि परिसरातील लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने अभयला अत्यंत गंभीर अवस्थेत उपचारासाठी लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, गोळी छातीत खोलवर लागल्याने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अभयचे आजोबा मोतीराम मराठे (वय ८३) यांनी दीर्घकाळापासून सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादातून स्वतःच्या नातवाचा खून केला. आजोबाला शिकारीचा शौक असल्यामुळे त्यांच्याकडे परवानाधारक रायफल आहे. या रायफलमधूनच त्यांनी अभयवर गोळी झाडली. घरातीलच काही व्यक्तींनी पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करून रायफल साफ करताना गोळी सुटल्याचा बनाव रचला.

परंतु, पोस्टमार्टम रिपोर्टमधून जी माहिती समोर आली ते पाहून पोलिसांना शंका आली. गोळी लागल्याने शरीराला झालेली जखम आणि गोळीबाराची दिशा यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यानंतर हॉटेलमधील वेटरसह इतर संबंधित व्यक्तींकडे चौकशी करण्यात आली. तपास सुरु असताना अभ्याचा अपघाती मृत्यू नसून खून झालेला आहे या निष्कर्षाला पोलीस पोहोचले. पुणे ग्रामीण पोलीस आणि गुन्हे शाखेने केलेल्या तपासात मोतीराम मराठे यांनी अभयवर गोळी झाडल्याचे निष्पन्न झाले. लोणावळा शहर पोलिसांनी मोतीराम मराठेला अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

अभय माणिक मराठे हे व्यवसायाने वकील होते. तसेच लोणावळा शहराचे माजी नगरसेवक आणि हॉटेल व्यावसायिक माणिक मराठे यांचे ते पुत्र होते.

Vedh News