भररस्त्यात उभ्या लक्झरी बसमुळे वाकडमध्ये वाहतूक कोंडी… कारण ऐकून चक्रावून जाल

पिंपरी- वाकड परिसरात रिक्षाचालक आणि खासगी लक्झरी ट्रॅव्हल्सच्या चालकामध्ये किरकोळ वाद झाला. या वादानंतर रिक्षाचालकाने जे काही केले त्यामुळे वाकड परिसरात अन्य वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागला. असे काय घडले ?
वाकड परिसरात रिक्षाचालक आणि खासगी बस चालकामध्ये सोमवारी रात्री किरकोळ कारणावरून बाचाबाची व वाद झाला. या वादानंतर संतापलेल्या रिक्षाचालकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या लक्झरी ट्रॅव्हल्सची चावी काढून घेतली आणि तेथून पसार झाला. बसची चावी नसल्यामुळे चालकाला बस रस्त्यावरून बाजूला घेता आली नाही. यामुळे वाकड परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
बस रस्त्यातच बंद असल्यामुळे त्यातील प्रवाशांना आणि इतर वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अखेर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. चावी घेऊन फरार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सुरू आहे.






