एअरपोर्ट येथील पार्किंग मॅनेजरवर कोयत्याने वार, दोघांवर गुन्हा

पुणे- पार्किंग मॅनेजरला बाहेर बोलावून ‘‘ तू पोलीस का टिपर है, तू कुत्ता है, हम यहा के भाई है, तेरे को मारने के लिए मेरे पास बहुत बच्चे लोग है’’ असे म्हणून त्यांच्या डोक्यात, पाठीत वार करुन जखमी केले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
जाहिद शेख (रा. बर्मा शेल, इंदिरानगर), मोहन ऊर्फ तम्मा (रा. इंदिरानगर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सतीश रमेश टिळे (वय २५, रा. साई कृपा सोसायटी, सोमनाथनगर, वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना एअरपोर्ट येथील एरॉमॉल शेजारील लिलाई पार्किंग कार्यालयाबाहेर ३ ऑक्टोंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश टिळे हे ऐरॉमॉल शेजारी असलेल्या लिलाई पार्किंग येथे पार्किंग मॅनेजर म्हणून काम करतात. ते ३ ऑक्टोंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लिलाई पार्किंग कार्यालयामध्ये बसले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा व पार्किंगला कधी तरी येत असलेला जाहिद शेख व मोहन हे दोघे कार्यालयात आले. त्यांनी तुझ्याशी बोलायचे आहे, तू जरा माझ्याबरोबर ये, असे म्हणून हात धरुन पार्किंगच्या मागील भागात जेथे रिक्षा लागतात, तेथे नेले.
जाहिद म्हणाला, ‘‘तू पोलीस का टिपर है, तू कुत्ता है, तेरे को मारने के लिए मेरे पास बहुत बच्चे लोग है’’ असे म्हणून त्याने शर्टच्या मागे आतमध्ये लपवलेला कोयता बाहेर काढला. ‘‘मै इधर का भाई हू, हम लोगों के नाद को नही लगने का, नही तो काट डालुंगा,’’ असे म्हणून हातातील हत्यारे हवेत फिरवुन मोठ मोठ्याने ओरडून शिवीगाळ करत सतीश टिळे यांच्या डोक्यात व पोटावर उलटा कोयता मारला. त्याच्याबरोबर असलेल्या मोहन याने देखील हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी त्यांच्या मदतीला लोक येऊ लागले. तेव्हा त्याने कोयता बाहेर काढून एक एक को काट डालुंगा असे म्हणत दहशत माजवत ते पळून गेले. त्यानंतर लोकांनी त्यांना ससून रुग्णालयात नेले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक धनजंय गाडे तपास करीत आहेत.






