अल्पवयीन मुलाकडील बेकायदा पिस्तूलमधून अचानक गोळी सुटली; तरुण गंभीर जखमी

पुणे – बिबवेवाडी परिसरात १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाकडील कथित बेकायदा पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्याने एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गंगाधाम रस्त्यावरील आईमाता मंदिर परिसरात हा प्रकार घडला.
विजय भास्कर पाटील असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलाने कथितरीत्या बेकायदा पिस्तूल स्वतःजवळ बाळगले होते. पिस्तूल हाताळताना स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असतानाही ते निष्काळजीपणे हाताळल्याचा आरोप आहे.
यावेळी पिस्तुलातून अचानक गोळी सुटली आणि ती विजय पाटील यांना लागली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार शिवानंद अशोक बोले (वय ३८) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला अटक न करता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.






