फ्लॅट खरेदीसाठी उसने पैसे घेऊन जवानाची १५ लाखांची फसवणूक ; निवृत्त आर्मी अधिकार्यासह ५ जणांवर गुन्हा

पुणे – फ्लॅट खरेदीसाठी १५ लाख रुपये घेऊन ते परत न करता फसवणुक केली. पैसे परत मागितल्यावर शिवीगाळ करुन जीवे मारण्याची व जवानाच्या नोकरीवर परिणाम करण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरुन निवृत्त आर्मी अधिकार्यासह ५ जणांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत निलेश प्रल्हाद राठोड (वय ३२, रा. पुसद, जि. यवतमाळ, सध्या रा. आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल, सुब्रेता पार्क, नवी दिल्ली) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सेवानिवृत्त आर्मी अधिकारी मुकेशकुमार मनोहर कावरे (वय ५१), खुशी मुकेशकुमार कावरे (वय २३), योगिता मुकेशकुमार कावरे (वय ४५), कौशल्या कावरे (वय ७०), पुष्करराज मुकेशकुमार कावरे (वय २०, सर्व रा. महंमदवाडी, कोंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ही घटना कोंढव्यात जून २०२१ ते ७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सार्जंट म्हणून लष्करात काम करतात. मुकेशकुमार यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून फ्लॅट खरेदीसाठी १५ लाख रुपये परत देण्याच्या बोलीवर घेतले होते. त्यांनी ते पैसे परत केले नाही. खुशी कावरे व इतरांशी संगनमत करुन त्यांची फसवणूक केली.
फिर्यादी यांनी पैसे परत मागितले असताना आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. जीवे मारण्याची व फिर्यादी यांच्या नोकरीवर परिणाम करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण तपास करीत आहेत.





