फुरसुंगीत सुगंधित तंबाखूच्या कारखान्यावर छापा ; गुन्हे शाखा आणि ‘एफडीए’ची संयुक्त कारवाई, दोघांना अटक
पुणे – फुरसुंगी येथील उरुळी देवाची परिसरात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या सुगंधित तंबाखू आणि जर्दा निर्मितीच्या कारखाना उध्वस्त करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट- पाच आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संयुक्त छापा टाकून ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मध्य प्रदेशातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
सुशिलसिंग विश्वनाथ तोमर (वय-२६) आणि उमेशसिंग रामदीन तोमर (वय-२३, दोघे मूळ रा. तारेनी, मोरेना, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथील उरुळी देवाची परिसरात अवैधरीत्या सुगंधित तंबाखू बनविण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती युनिट- पाचचे पोलीस अंमलदार नासिर देशमुख आणि सुधीर सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, सहाय्यक निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, औषध प्रशासनाचे अधिकारी नारायण सरकटे, पूजा बगाडे यांच्या पथकाने उरुळी देवाची येथील आदर्शनगर परिसरातील एका घरात सुरू असलेल्या कारखान्यात छापा टाकला. तेथे दोघे जण प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे उत्पादन करताना आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुगंधित तंबाखूचे ५९ बॉक्स, चीजचे एक हजार ८० डबे, पाऊच पॅकिंग मशीन, रोझ वॉटर, मेन्थॉलचे बॉक्स आणि ग्लिसरॉल कॅन असा ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक संदीपान पवार तसेच, पोलीस अंमलदार अमर चव्हाण, प्रताप गायकवाड, अकबर शेख, परमेश्वर कदम, शहाजी काळे, राहुल गोसावी, राहुल ढमढेरे, नेत्रिका अडसुळ, जयश्री भालेराव, मयूरी पालवे, श्रीदेवी फाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहेत.
