आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाजी संघाची बाजी ; पिंपरी-चिंचवडच्या प्रिथिका प्रदीपचे नेत्रदीपक यश

पिंपरी- एची-नागोया आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कंपाऊंड धनुर्विद्या संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात भारताने चीन संघाचा 238-234 अशा गुणांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक भारतीय संघामधील पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडू प्रिथिका प्रदीप, ज्योती सुरेखा वेन्नम आणि चिकिता तनीपार्थी या महिला खेळाडूंनी मोलाची कामगिरी केली.
भारतीय महिला कंपाऊंड संघाने एशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ करत आघाडी कायम ठेवली आणि अंतिम फेरीत अचूक निशाणा साधत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. भारताचा २३८ गुणांचा अंतिम स्कोअर हा दक्षिण कोरियाने २०१४ मध्ये नोंदवलेल्या जागतिक विक्रमाशी बरोबरी करणारा ठरला. उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियाचा २३८-२३४ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ज्योती सुरेखा वेन्नम यांचे हे एशियाई क्रीडा स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक आहे, तर प्रिथिका प्रदीप आणि चिकिता तनीपार्थी यांनी आपल्या पहिल्याच एशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा मान मिळवला आहे.
प्रिथिका प्रदीपच्या या ऐतिहासिक यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात अभिमानाने उंचावले आहे. पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या धनुर्विद्येच्या विकासकार्याला आणि खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या संधींना या यशामुळे नवी प्रेरणा मिळाली आहे. प्रिथिका प्रदीपच्या या सुवर्ण कामगिरीने पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा इतिहासात एक नवा अध्याय लिहिला असून, तिच्या यशाने महाराष्ट्रातील आणि देशातील युवा धनुर्विद्या खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सहसचिव आणि पिंपरी-चिंचवड आर्चरी असोसिएशनचे सचिव सोनल बुंदेले यांनी विजयी संघाचे अभिनंदन करताना म्हटले की, प्रिथिका प्रदीपची गुणवत्ता आणि तिच्यातील विशेष टॅलेंट शालेय वयात असतानाच ओळखण्याची संधी मला मिळाली. त्या छोट्या वयात तिच्यामध्ये दिसलेली जिद्द, मेहनत, शिकण्याची तयारी आणि खेळाप्रती असलेली निष्ठा आज एशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकापर्यंत पोहोचली आहे, याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. प्रिथिकाचे हे यश संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरा साठी व तसेच महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी गौरवाची बाब आहे. तिच्या या सुवर्ण कामगिरीमुळे देशातील अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल. या यशामध्ये प्रिथिकाची सातत्यपूर्ण मेहनत, तिचे प्रशिक्षक कुणाल टावरे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि तिच्या पालकांचा भक्कम पाठिंबा यांचे मोठे योगदान आहे.






