ठाणे हादरले ! शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या

ठाणे हादरले ! शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या
Share

ठाणे – ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मंगळवारी रात्री ९.३० वाजता त्यांच्यावर गोळीबाराच्या दोन फैरी झाडण्यात आल्या आहेत. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गणेशनगरमध्ये प्रदीप पुर्णेकर यांच्या कार्यालयात त्यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या छातीला, तर एक गोळी त्यांच्या मांडीला लागली. त्यांना तातडीने जवळच्या इन्फिनिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र पूर्णेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी प्रदीप पुर्णेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा हल्ला नेमका कोणत्या उद्देशाने झाला हे रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही.

गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून त्यात दोघे आरोपी चेहऱ्याला रुमाल बांधून बाईकवरुन आल्याचे दिसते. एकूण पाच आरोपी असल्याचा संशय आहे. निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कलुसिया हे चौघे संशयित असून त्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक पोलीस, क्राइम ब्रांचची एकूण ९ पथके आरोपींचा शोध घेत आहेत.

दरम्यान, ठाणे महापालिका निवडणुकीत मनोरमा नगर भागातील प्रभाग क्रमांक : ३ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख असलेल्या प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर आणि बंधू जयनाथ पूर्णेकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Vedh News