पुणे महापालिका आयुक्तांना सत्ताधारी आमदाराची ॲट्रॉसिटीची धमकी, कोण आहे हा आमदार ?

पुणे महापालिका आयुक्तांना सत्ताधारी आमदाराची ॲट्रॉसिटीची धमकी, कोण आहे हा आमदार ?
Share

पुणे- आपल्या ठेकेदाराला रस्त्याचे काम दिले नाही म्हणून शहरातील सत्ताधारी आमदाराने महापालिका आयुक्तांनाच ‘ॲट्रॉसिटी’ची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयुक्तांनी त्यास दुजोरा दिला परंतु हा आमदार कोण हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे हा आमदार कोण असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

महापालिकेने आरटीओ ते बंडगार्डन पूल या वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून दोन किमी लांब आणि १७ मीटर रुंद ​असणारा मुळा-मुठा नदीच्या कडेने वेलस्ली रस्ता ​प्रस्तावित केला आहे. या रस्त्यासाठी डिसेंबर २०२५ मध्ये निविदा काढण्यात आली होती. ​त्यासाठी आठ ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. नियमानुसार, कागदपत्रांची छाननी करून पात्र ठेकेदारांची यादी जाहीर करणे आवश्‍यक होते; प​रंतु एका सत्ताधारी आमदाराने आपल्याच ठेकेदाराला हे काम मिळावे, यासाठी हट्ट धरला.

निविदा भरलेल्या एका ठेकेदाराला अपात्र कर​ण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला. त्यामुळे​ सुमारे सहा-सात महिने ही प्रकिया ठप्प ​राहिली. ​हा प्रकार ​समजल्यानंतर पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी पथ विभागाला नियमानुसार प्रक्रिया ​राबविण्याचा आदेश दिला. ​त्यात आमदारांकडून अपात्र ठरविण्यासाठी दबाव असलेल्या ठेकेदाराचीच निविदा सर्वांत कमी दराने आल्याने त्यालाच हे काम मिळाले. त्यामुळे संतप्त आमदाराने थेट महापालिका आयुक्तांना फोन करून ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. ​या संदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता आयुक्तांनी त्यास दुजोरा दिला; ​परंतु हा आमदार कोण हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

दरम्यान सत्ताधारी आमदाराच्या धमकीला न जुमानता नियमानुसार पात्र ठेकेदाराला काम देण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेचे सुमारे नऊ कोटी रुपये वाचणार आहेत.

Vedh News