ब्रेकिंग न्यूज

ध्वनीप्रदूषणाविरोधात लढणाऱ्या बापटांचा अमोल पालेकर यांच्या हस्ते सत्कार

Share

पुणे- विद्यानंद बापट यांचा संघर्ष हा नागरिकांनी व्यवस्थेविरोधात उभ्या केलेल्या संघर्षाचे प्रतीक आहे. ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नासोबतच बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकतेचाही त्यांनी पाठपुरावा केला, ही लाखमोलाची बाब आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केले. मधुरजग प्रतिष्ठान, ब्राईट्स सोसायटी आणि विचारवेधतर्फे विद्यानंद बापट यांचा गौरव करण्यात आला त्यावेळी पालेकर बोलत होते. सार्वजनिक उत्सवांमधील कर्णकर्कश्य आवाजाला निर्भयपणे विरोध करणाऱ्या बापट यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ज्येष्ठ अभिनेते सुमित राघवन, अभिनेत्री चिन्मयी सुमित, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि कुमार नागे उपस्थित होते.

पालेकर म्हणाले की, विद्यानंद बापट यांचा लढा हा नागरिकाने व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो. ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नावर बापट यांच्या मागे सर्वसामान्य पुणेकर उभे राहिले, ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरच न थांबता बापट यांनी बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकतेचाही पाठपुरावा केला. नास्तिक म्हणजे अश्रद्ध, असे सरधोपट समीकरण केले जाते. बापट यांची समाजहिताबाबतची निष्ठा हीच त्यांची बांधिलकी असल्याचे पालेकर म्हणाले. यावेळी बापट यांनी नागरिकांच्या शांततेच्या अधिकाराचा मुद्दा मांडला. ध्वनीप्रदूषणाप्रमाणेच कचरा व्यवस्थापन, रस्त्यांवरील खड्डे आणि पाण्याचे नियोजन हे नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय झाले पाहिजे. छोट्या पातळीवर का होईना, नागरिकांनी विरोधाची भूमिका घेत राहणे आवश्यक असल्याचे पालेकर यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना विद्यानंद बापट यांनी भूमिका मांडली की, सार्वजनिक ठिकाणी केवळ रात्रीच नव्हे, तर २४ तास ध्वनिवर्धकांवर (लाऊडस्पीकर) बंदी असायला हवी. प्रथा आणि परंपरांच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरणाऱ्या गोष्टींचे समर्थन केले जाऊ शकत नाही आणि कायद्यातील पळवाटांमुळेच उत्सवांमध्ये हा धुमाकूळ वाढतो, अशी टीका त्यांनी केली. सध्याच्या काळात पेठांमध्ये उत्सवाव्यतिरिक्त अन्य दिवशी सुद्धा राहणे हीच मुळात एक शिक्षा झालेली आहे. कारण पेठांची जी वस्ती आहे, ती अशी १५० वर्षांच्या पूर्वीचं जे दैनंदिन जीवनमान होतं त्याला अनुसरून ती वस्ती, तिथलं बांधकाम, तिथल्या रस्त्यांची रुंदी वगैरे आहे आणि विशेषतः सणांच्या काळामध्ये तर तिथलं जीवनमान अगदी असह्य होतं, असंही पुढे बापटांनी म्हटले. प्रत्यक्षात नागरिक पेठा सोडून पलायन करतायत, स्वतःची राहती घरं हे सोडून नागरिक पळून जातायत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि शेण खाऊन आणि गोमूत्र पिऊन माजलेले देवभोळे, धर्मभोळे उत्सवखोर हे सोल्यूशन म्हणून सांगतायत की ज्यांना त्रास होत असेल त्यांनी म्हणे पेठा सोडून निघून जावे.

यावेळी बोलताना सुमित राघवन यांनी “संस्कृत आणि संस्कृतीपेक्षा माणसाने सुसंस्कृत असणे जास्त महत्त्वाचे आहे” असे सांगत सध्या समाजातील विचारांची पातळी खालावली आणि आवाजाची पातळी वाढली असल्याची खंत व्यक्त केली.