ब्रेकिंग न्यूज

नसरापूर जवळील फार्महाऊसच्या कौलावर आढळला महाकाय अजगर

Share

पुणे – भोर तालुक्यातील नसरापूरजवळील दीडघर येथे एका फार्महाऊसवर तब्बल ९ ते १० फूट लांबीच्या महाकाय अजगर दिसून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका कामगाराला कौलांच्या अरुंद ढिगाऱ्याखाली भलामोठा अजगर जात असल्याचे दिसले. अखेर या अजगराला सर्परक्षकांच्या टीमने मोठ्या कौशल्याने आणि सुरक्षितपणे बाहेर काढून वनविभागाच्या स्वाधीन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, दीडघर येथील डॉ. विराज सूर्यवंशी यांच्या फार्महाऊसच्या आवारात रचून ठेवलेल्या कौलांच्या ढिगाऱ्याखाली एक प्रचंड मोठा अजगर सरपटत शिरत असल्याचे एका सतर्क कामगाराच्या निदर्शनास आले. कामगाराने क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ डॉ. सूर्यवंशी यांना या घटनेची माहिती दिली. डॉ. सूर्यवंशी यांनी त्वरित पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सुशील विभुते यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळाचा फोटो व्हॉट्सॲपवर पाठवला. फोटो पाहताच तो विषारी नसला तरी अत्यंत शक्तीशाली महाकाय अजगर असल्याचे स्पष्ट झाले.

घटनेचे गांभीर्य ओळखून अध्यक्ष सुशील विभुते यांच्यासह सर्परक्षक विलास धोंगडे, विशाल शिंदे, श्रीकांत खेडकर आणि सायली वालगुडे यांचे विशेष रेस्क्यू पथक तातडीने दीडघर येथे पोहोचले. अजगर कौलांच्या अतिशय अरुंद ढिगाऱ्यात अडकला होता. कौले अंगावर कोसळू नयेत आणि अजगराला कोणतीही इजा होऊ नये, याची पूर्ण काळजी घेत सर्परक्षकांनी अत्यंत शांतपणे एक-एक कौल बाजूला केला. अखेर तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर त्या महाकाय अजगराला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले. यशस्वी रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्परक्षकांनी नसरापूर वनविभागाचे वनरक्षक गुट्टे यांना घटनेची माहिती दिली आणि पकडलेल्या अजगराला त्यांच्या सुपूर्द केले. अजगराला सुरक्षित निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. वेळेत रेस्क्यू झाल्यामुळे मोठा धोका टळला असून फार्महाऊस मालक आणि परिसरातील नागरिकांनी सर्परक्षकांच्या तत्परतेचे आभार मानले आहेत.