पुणे – पुण्यातील हडपसर-माळवाडी येथील शिवनेरी कामधेनू इस्टेटमधील दुकानाच्या व्यवहारात बनावट समझोता करार तयार केल्याप्रकरणी एका पत्रकारासह ७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कराराच्या आधारे खोटा गुन्हा दाखल करणे, संबंधित व्यक्तीची बदनामी करणे आणि बेकायदेशीर फायदा मिळवणे हा उद्देश असल्याचे समोर आले आहे.
केदार माधव बिडवई, गजानन बिडवई, तुषार पायगुडे, विनोद रमेश कुलकर्णी, बनावट स्वाक्षरी करणारा इसम, जुन्या तारखेचा स्टॅम्प पेपर उपलब्ध करून देणारा स्टॅम्प विक्रेता यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. या प्रकरणी राजेंद्र केशवराव मोकाशी (वय ५९ ललित महाल सोसायटी, बाणेर ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोकाशी यांचा मुलगा ज्योतिरादित्य मोकाशी यांच्या नावाने २५ मे २०२२ रोजी हडपसर माळवाडी येथील शिवनेरी कामधेनू इस्टेटमधील सुमारे २३५ चौ फुटाचे दुकान १८ लाख रुपयांना खरेदी करण्यात आले होते. खरेदीपूर्वी पेपर नोटीस देऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. तसेच संपूर्ण व्यवहार बँकेच्या चेकद्वारे करण्यात आले होते.
दरम्यान मे २०२५ मध्ये केदार बिडवाई यांनी मोकाशी आणि त्यांच्या मुलाच्या विरुद्ध सावकारी व्यवहारातून दुकान खरेदी केल्याचा तसेच दमदाटी केल्याचा आरोप करत पोलीस आयुक्तांकडे अर्ज केला होता. या अर्जासोबत ज्योतिरादित्य मोकाशी आणि केदार बिडवाई यांच्यात २०२२ मध्ये समझोता झाल्याचे दर्शवणारा कथित करार सादर करण्यात आला होता.
या अर्जाची गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक-२ कडून चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपांमध्ये तथ्य आढळून न आल्यामुळे संबंधित अर्ज सरकारी दफ्तरी दाखल करण्यात आला. त्यानंतर मोकाशी यांनी माहितीच्या अधिकारातुन या चौकशीची कागदपत्रे मिळवली. कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर सादर समझोता करार बनावट असल्याचा संशय आला. त्यानंतर मोकाशी यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.
गुन्हे शाखा युनिट ७ काडूंकरण्यात आलेल्या चौकशीत कथित समझोता करार बनावट तयार करण्यात आल्याचे आणि त्यावरील ज्योतिरादित्य मोकाशी यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तसेच या करारासाठी वापरण्यात आलेला स्टॅम्पपेपर २०२५ मध्ये वापरलेला असताना तो २०२२ शाळांचा असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय पोलीस आयुक्तांकडे कराराची मूळ प्रत न देता झेरॉक्स प्रत देण्यात आली होती. मुलं कागदपत्रे स्वतःकडे ठेवून त्यातील कथित बनावटपणा उघड होऊ नये, असा आरोप मोकाशी यांनी केला आहे.
केदार बिडवाई आणि इतर संबंधित व्यक्तींनी बनावट समझोता करार करून त्याचा वापर केला. या माध्यमातून मोकाशी आणि त्यांच्या मुलाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल व्हावा, त्यांची बदनामी व्हावी आणि स्वतःला बेकायदेशीर फायदा मिळावा या उद्देशाने कट रचल्याचा आरोप फिर्यादी मोकाशी यांनी केला. त्यानुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड करीत आहे.
