पिंपरी- पर्यावरणाचे रक्षण आणि उत्सवाचा आनंद दोन्ही एकत्र साधता येतात, हा संदेश देत भूगोल फाउंडेशन महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने अनंत चतुर्दशी दिवशी राबविलेल्या पर्यावरणपूरक गणेश विसर्जन जनजागृती अभियानाला नागरिक, गणेश मंडळे आणि प्रशासनाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या अभियानाचे नियोजन दोन टप्प्यात करण्यात आले होते. पहिला टप्पा दुपारी १ ते ५ या वेळेत इंद्रायणी नदीच्या मोशी येथील घाटावर पार पडला. यावेळी फाउंडेशनचे स्वयंसेवक हातात ‘स्वच्छ नदी स्वच्छ तलाव’, ‘शाडु किंवा मातीचीच मूर्ती घ्या’, ‘पर्यावरणपूरक गणेश विसर्जन’, ‘एक झाड लावा पर्यावरण वाचवा’, ‘जल सुरक्षित तो कल सुरक्षित’ असे जनजागृती करणारे फलक घेऊन उभे होते.
विसर्जनासाठी येणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीला थांबवून त्यांना नदीत हार, फुले, प्लास्टिकच्या पिशव्या न टाकण्याचे विनम्र आवाहन करण्यात आले. पालिकेने ठेवलेल्या निर्माल्य कलशातच निर्माल्य दान करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले व निर्माल्य जमा करुन कलशातून ठेवत होते. या वेळेत सुमारे १००० हून अधिक मूर्ती विसर्जनासाठी संकलित करण्यात आल्या त्यापैकी अनेक मोठ्या सार्वजनिक मंडळांनी, नागरिकांनी जागेवरच निर्माल्यदान करण्यास सहमती दर्शवली.
दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी ६ नंतर संतनगर मोशी-प्राधिकरण सेक्टर-६ येथील कृत्रिम विसर्जन हौदाजवळ घेण्यात आला. याठिकाणी शाडू किंवा मातीच्या मूर्ती वापरण्याचे, थर्माकोल आणि प्लास्टिकची सजावट टाळून नैसर्गिक साहित्य वापरण्याचे, प्लॅस्टिक न वापरण्याचे, झाडे लावा झाडे जगवा, अशा घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. नदीत हार, फुले, प्लास्टिक पिशव्या टाकू नका, पालिकेने ठेवलेल्या कलशातच निर्माल्या दान करा असे आवाहन करण्यात आले. अनेक नागरिकांनी ‘आम्ही पुढच्या वर्षीपासून शाडुचीच मूर्ती घेऊ” असा संकल्प केला. पोलीस, पालिकेच्या प्रशासन कर्मचा-यांनी, अनेक नागरिकांनी भूगोल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलनाना वाळुंज म्हणाले की, गणेशभक्ती आणि पर्यावरण भक्ती एकत्रच असली पाहिजे. जल सुरक्षित तो कल सुरक्षित हा संदेश घेऊन दरवर्षी हा उपक्रम राबवतो. तरी नागरिकांनी पर्यावरणासाठी उपक्रमात सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.
या अभियानात भूगोल फाउंडेशनचे पदाधिकारी अध्यक्ष विठ्ठलनाना वाळुंज, अजय म्हस्के, हभप गुलचंद लोखंडे, राजेश किबिले, पार्थ दरंदळे, विनायक वाबळे महिला आघाडीच्या शोभा फटांगडे, ज्योती दरंदळे, आशा वाळुंज, शीला इचके, मीना आखाडे, अपुर्वा वाळुंज, संगीता इचके, सुरेखा गावडे, रोहिणी वाळुंज, वटेश्वर महिला भजनी मंडळ, युवा कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी आणि मोशी, संतनगर परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची संकल्पना शोभा फटांगडे यांनी मांडली व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती दरंदळे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.

