पुणे- पुणे शहर पोलीस दलातील एक धाडसी, हुशार आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे (वय ५०) यांचे शुक्रवारी (२५ सप्टेंबर) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने धक्कादायक निधन झाले. तेलंगे हे वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते सध्या ते पोलीस आयुक्त कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.
तेलंगे हे गुरुवारी रात्री काम आटोपून घरी गेले होते. शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील निवासस्थानाजवळ गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारत असताना त्यांना अचानक चक्कर आली. कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गोपनीय विभागात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडणाऱ्या तेलंगे यांच्या या आकस्मिक निधनाने पुणे पोलीस दलात तीव्र हळहळ व्यक्त होत असून सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.
