ब्रेकिंग न्यूज

आधी पीएमओकडून तारीख मिळेना, आता आचारसंहिता आली आडवी, हिंजवडी मेट्रो उदघाटन पुन्हा लांबणीवर

Share

पुणे – हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या उदघाटनासाठी तारीख पे तारीख सुरु आहे. आधी उदघाटन करण्यासाठी पीएमओ कडून उद्घाटनाची तारीख मिळत नव्हती. त्यातच आता विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या पुणे मेट्रो मार्ग ३ चे लोकार्पण पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो मार्ग ३ च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच, आता या प्रकल्पावर आचारसंहितेचे सावट निर्माण झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) उद्घाटनाची निश्चित तारीख अद्याप मिळालेली नाही, त्यातच विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे या मेट्रोचे लोकार्पण पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पीएमआरडीएने या मार्गावरील २३ पैकी १७ स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन केले होते. या सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव होता. मात्र, निवडणूक आयोगाने पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणा केल्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात हा उद्घाटन समारंभ घेता येईल का, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

या संदर्भात पीएमआरडीएचे महानगर आयुक्त अभिजित चौधरी यांनी सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाकडून उद्घाटनाची अंतिम तारीख अद्याप आलेली नाही. दरम्यानच्या काळात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत लोकार्पण सोहळा आयोजित करता येऊ शकतो किंवा नाही, याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवण्यात येईल आणि निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.