पुणे- गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार्या मंडळांना फक्त २ ढोल पथकांचा समावेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच या ढोल ताशा पथकाला प्रत्येक चौकात फक्त १० मिनिटे स्थिर वादनास परवानगी दिली जाणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि विसर्जन मिरवणूक सुरक्षित पार पाडण्यासाठी सुमारे १० हजार पोलीस दल तैनात केल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, राजेश बनसोडे, मनोज पाटील,संजय पाटील तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मागील १० दिवसांपासून गणेशोत्सव शांततेत पार पडल्याबद्दल पुणेकरांचे कौतुक करत, आगामी तीन दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगत सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.
आयुक्त म्हणाले की, यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रोडवरुन २६७ मंडळे, टिळक रोड २३१ मंडळे, केळकर रोडवरुन ७९ मंडळे आणि कुमठेकर रोडवरुन ५० गणेश मंडळे असे एकूण ६३८ गणेश मंडळे मुख्य चार विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार्या मंडळांना फक्त २ ढोल पथकांचा समावेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. २ ढोल पथकांना परवानगी दिली असली तरी त्या पथकातील संख्येवर मर्यादा घालण्यात आली नाही. परंतु, ही ढोल पथके खूप मोठी नसावी, असे मंडळांना सांगण्यात आले आहे. तसेच या ढोल ताशा पथकाला प्रत्येक चौकात फक्त १० मिनिटे स्थिर वादनास परवानगी दिली जाणार आहे. याबाबत प्रमुख चार विसर्जन मिरवणुक मार्गावर सहभागी होणार्या ६३८ गणेश मंडळे तसेच ढोल पथकांशी याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे.
या विसर्जन मिरवणुकीसाठीस्थानिक पोलीस, बाहेरून मागवण्यात आलेली कुमक आणि होमगार्ड्स मिळून १० हजार पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या बंदोबस्ताची आखणी पूर्ण झाली असून त्याची पाहणी गुरुवारी सायंकाळी करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात आवाजाची पातळी मर्यादा ओलांडणार्या २४ मंडळांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली असून त्यांची साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत टोल, प्लाझमा, प्रेशर मिड, लेझर लाईट यांना बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार्या मंडळाची साऊंड सिस्टीम अगोदरच तपासण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विसर्जन मिरवणुकीत होणारी गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अलका टॉकीज चौक, बेलबाग चौक ते मंडई या परिसरात कोठेही गडबड, गोंधळ होऊ नये, यादृष्टीने आवश्यक तयारी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, एआय बेस कॅमेरे विसर्जन मिरवणुक मार्गावर तैनात करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे विसर्जन मिरवणुकीत होणार्या गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी शहरात २६ अधिकृत पार्किंग झोन जाहीर करण्यात आले आहेत. तसेच जी मंडळे गेल्या २ किंवा अधिक वर्षांपासून या मार्गांवरून जात आहेत, त्यांनाच यंदा परवानगी देण्यात आली आहे. शहराच्या इतर भागातून नव्याने मुख्य मार्गावर येणाऱ्या मंडळांना यंदा परवानगी नाकारण्यात आली आहे. गर्दीचे नियंत्रण करणे हे यामागील मुख्य कारण असल्याचे यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले .
