ब्रेकिंग न्यूज

किल्ले रायगडावर जाणारी रोप वे सेवा १५ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार

Share

महाड- छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी रोप वे ही पावसाळी हंगामानंतर देखभाल दुरुस्तीसाठी काही काळ बंद राहणार आहे. पण यामुळे किल्ल्यावर जाणाऱ्या शिव भक्तांची मोठी गैरसोय होणार आहे. याबाबतची माहिती रायगड किल्ला रोपवे व्यवस्थापनकडून देण्यात आली आहे.

किल्ले रायगडावर जाण्यासाठी रोपवे ही पर्यटकांसह शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची सुविधा मानली जाते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच पायी चढाई करण्यास अडचण असलेल्या पर्यटकांसाठी रोपवेच्या माध्यमातून किल्ल्यावर पोहोचणे सुलभ होते. त्यामुळे रोपवे सेवा बंद राहणार असल्याने या कालावधीत रायगडावर येणाऱ्या पर्यटकांना पायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

रोपवेच्या सुरक्षित आणि सुरळीत संचालनाच्या दृष्टीने दरवर्षी हंगामपूर्व देखभाल आणि तांत्रिक तपासणी केली जाते. याच अनुषंगाने यंदाही रोपवेच्या विविध यंत्रणा, तांत्रिक बाबी आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यात येत आहे. देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याबरोबरच आवश्यक सुरक्षा तपासण्या करण्यात येणार आहेत.

सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण झाल्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ पासून रोपवे सेवा पुन्हा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मात्र, देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणीची कामे पूर्ण झाल्यानंतरच सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत अधिकृत माहिती देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, रोपवे सेवा बंद राहणार असल्याने किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. या गैरसोयीबद्दल रायगड रोपवे प्रशासनाच्या वतीने राजेंद्र खातू यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.