पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी ‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ असे साकडे गणरायाला घातल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले.
अमित ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या कामाचा दाखला देताना त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास व्यक्त केला. “राज ठाकरे यांच्यासारखा माणूस मुख्यमंत्रिपदावर असावा. मला माहिती आहे तो माणूस काय काम करू शकतो. त्यांनी नाशिक शहरात खूप काम केलं आहे. ते नाशिक शहरात एवढं काम करू शकत असतील, तर राज्यासाठीही खूप काही करू शकतात,” असं अमित ठाकरे म्हणाले.
राज्यात सध्या अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असे सांगत अमित ठाकरेंनी पेपरफुटी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. या प्रश्नांवर राज ठाकरे काम करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांचं हे वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यात पावसाचा खंड पडल्याने अनेक भागांतील शेतकरी अडचणीत आहेत. याच पार्श्वभूमीवर दुष्काळ आढावा बैठकीत खासदारांना काजू-बदाम देण्यात आल्याच्या मुद्द्यावरूनही अमित ठाकरेंनी सरकारला टोला लगावला.
“तुम्ही अन्न खायचं बंद करा, असं आमचं मत नाही. तुम्हाला काय खायचं ते खा. पण जनतेचे प्रश्न सोडवा. रुममध्ये बसून तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न समजणार नाहीत. शेतकऱ्यांच्या घरात जा,” असा सल्ला अमित ठाकरेंनी दिला.
