जुन्नर- येथील कृष्णराव मुंढे विद्यालयाच्या वसतिगृहात राहणारे तीन विद्यार्थी गेल्या १९ दिवसांहून अधिक कालावधीपासून बेपत्ता असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. १९ दिवस उलटून गेले तरी त्यांचा ठावठिकाणा लागला नसल्यामुळे पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या घटनेने वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ओंकार नामदेव माळी (वय १६ ), सौरव दत्तू डामसे (वय १५), ज्ञानेश्वर बुधा दाभाडे (वय १४) वर्षे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. विद्यार्थी बेपत्ता झाल्याची फिर्याद नामदेव पांडुरंग माळी यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जुन्नर येथील कृष्णराव मुंढे विद्यालयात तसेच शासकीय आश्रमशाळा महाविद्यालयात हे विद्यार्थी शिकत होते. संस्थेच्या वसतिगृहात हे विद्यार्थी राहात होते. मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११ या दरम्यान वसतिगृहाच्या परिसरातून निघून गेले आहेत.
या विद्यार्थ्यांविषयी कोणतीही माहिती असल्यास तत्काळ जुन्नर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुंड यांनी केले आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व ग्रामस्थानी आक्रमक भूमिका घेत संस्था पदाधिकाऱ्यांना जाब विचारत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले.
या विद्यार्थ्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे
ओंकार नामदेव माळी- उंची ५ फुट, रंग गोरा, चेहरा गोल, केस-काळे व आकाराने बारीक, नाक-सरळ, बांधा-सडपातळ, नेसणीस निळ्या रंगाची जिन्स व लाल रंगाचा फुल बाहीचा शर्ट पायात काळ्या रंगाची चप्पल.
सौरव दत्तू डामसे- उंची ४.५ फुट, रंग निमगोरा, चेहरा गोल, केस काळे व आकाराने बारीक, नाक-सरळ, बांधा-सडपातळ, नेसणीस- काळ्या रंगाची साधी पँन्ट व पांढ-या रंगाचा फुल बाहीचा शर्ट पायात काळ्या रंगाची चप्पल.
ज्ञानेश्वर बुधा दाभाडे- उंची ४.५ फुट, रंग गोरा, चेहरा उभट, केस काळे व आकाराने बारीक, नाक-सरळ, बांधा-सडपातळ, नेसणीस- काळ्या रंगाची साधी पँन्ट व पांढ-या रंगाचा फुल बाहीचा शर्ट पायात काळ्या रंगाची चप्पल.
