ब्रेकिंग न्यूज

कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून दोघी बहिणींना दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण 

Share

पुणे- कुत्र्याच्या अंगावर गाडी घातल्यानंतर तो भुंकल्याचा राग आल्याने दोघांनी दोघी बहिणींना दगड, लाथाबुक्क्यांनी तसेच सळईने मारहाण केली. वाघोलीतील वाघमारे वस्तीमध्ये मंगळवारी (ता.१५) हा प्रकार घडला. या मारहाणीत दोन्ही बहिणींना दुखापत झाली आहे.

या घटनेप्रकरणी जयश्री चव्हाण यांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ताराचंद काळराम वाघमारे आणि हिरामण काळराम वाघमारे यांच्यावर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री चव्हाण यांच्या पाळीव कुत्र्याच्या अंगावर आरोपींपैकी एकाने गाडी घातली. त्यावेळी त्यांच्या अंगावर कुत्रे भुंकले. त्याचा राग आरोपीला आला. त्यातून शाब्दिक वादावादी झाली. ताराचंद वाघमारे याने जयश्री चव्हाण यांना दगडाने तसेच हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात, छातीवर आणि पाठीवर दुखापत झाली. त्यानंतर त्यांची बहीण वैशाली यांनाही आरोपींनी मारहाण केली.

हिरामण वाघमारे याने हातातील लोखंडी सळईने वैशाली यांच्या डोक्यात आणि कमरेवर मारहाण केली. तसेच दोघींना हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाघोली पोलीस पुढील तपास करत आहेत.