ब्रेकिंग न्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ‘एसीबी’च्या जाळ्यात, १ लाख २० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Share

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका लिपिकाला मालमत्ता कर कमी करण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. सांगवी मधील आनंदनगर स्विमिंग टॅंक रस्त्यावर गुरुवारी (दि. ३) दुपारी ही कारवाई करण्यात आली.

उमेश सुबराव कुटे (वय ३७ नेवाळे वस्ती, चिखली) असे या लिपिकाचे नाव आहे. या प्रकरणी ५९ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारदार व्यक्तीने पिंपळे गुरव येथे जागा खरेदी करून त्यावर तीन मजली इमारत बांधली आहे. या जागेचा नवीन मालमत्ता कर आकारणी साठी त्यांनी २० ऑगस्ट रोजी सांगवी येथील कर आकारणी व कालसंकलन विभागीय कार्यालयात अर्ज दाखल केला होता. आरोपी कुठे याने तक्रारदाराला इमारतीचा वार्षिक मालमत्ता कर ९१ हजार ४७२ होईल असे सांगितले तसेच हा कर कमी करून ५० हजार होऊ शकतो असेही सांगितले. या कामासाठी त्याने दीड लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर १ लाख ३० हजार रुपयांची त्याने मागणी केली.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय पुणे येथे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर गुरुवारी दुपारी आनंदनगर स्विमिंग टॅंक रस्त्यावर सापळा रचून लाच स्वीकारताना कुठे याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यांनी ही कारवाई केली.