ब्रेकिंग न्यूज

माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या दोन गाड्यांची तोडफोड

Share

पुणे – भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या बी टी कवडे रस्ता भागातील निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या दोन महागड्या गाड्यांची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजकीय नेत्याच्या घराबाहेरच असा प्रकार घडल्याने पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, घोरपडी येथील बी. टी. कवडे रोड परिसरात असलेल्या ‘सिटाडेल एम्प्रेस’ या उच्चभ्रू सोसायटीमध्ये दिलीप कांबळे वास्तव्यास आहेत. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास कांबळे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत रात्री साधारण ८ ते ९ च्या दरम्यान हल्लेखोर सोसायटीच्या आवारात शिरले. त्यांनी कांबळे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन्ही चारचाकी गाड्यांवर दगड, लाठ्या आणि बांबूने जोरदार प्रहार केले. गाड्यांच्या काचा फोडून मोठे नुकसान करण्यात आले. रात्री जेव्हा कांबळे कुटुंबीय घरी परतले, तेव्हा घरासमोरील वाहने फोडण्यात आल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला.

हल्लेखोरांनी वाहनांची तोडफोड करण्यापूर्वी खबरदारी म्हणून घराच्या परिसरातील तीन महत्त्वाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर्स कापून टाकल्या होत्या. विशेष बाब म्हणजे, सोसायटीच्या पार्किंगमध्ये इतरही अनेक नागरिकांची वाहने उभी होती, मात्र हल्लेखोरांनी इतर कोणत्याही गाडीचे नुकसान न करता केवळ दिलीप कांबळे यांच्याच गाड्यांची तोडफोड केली.

​घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून दिलीप कांबळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परिसरातील मुख्य रस्त्यांवरील कॅमेरे आणि सोसायटीच्या प्रवेशद्वारावरील फुटेज तपासून संशयितांचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.