ब्रेकिंग न्यूज

विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ‘डीजेमुक्ती’साठी रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा

Share

पुणे- विद्यानंद बापट यांना गुरुवारी झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि ‘डीजे’च्या मुक्तीसाठी पुणेकरांनी येत्या रविवारी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता बालगंधर्व चौक, झाशीची राणी पुतळ्यापासून महापालिकेवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यात डीजे विरोधात पुणेकरांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यानंद बापट आपली आग्रही भूमिका मांडत आहेत. काल, गुरुवारी माध्यमांशी बोलत असताना संतोष चव्हाण नावाच्या व्यक्तीने बापट यांच्यावर हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ विद्यानंद बापट यांना पाठिंबा देत रविवारी ‘डीजेमुक्ती’साठी नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांनी विद्यानंद बापट यांच्या भूमिकेचे समर्थन करताना एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन रविवारी आयोजित आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राहुल सावंत यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच, डीजेच्या विरोधात आंदोलन जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. रविवारी सकाळी अकरा वाजता बालगंधर्व चौक, झाशीची राणी पुतळ्याजवळ एकत्र येऊन पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सावंत यांनी या व्हिडीओतून सांगितले आहे. सावंत यांनी या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.