ब्रेकिंग न्यूज

राममंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEO पदावर माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची निवड

Share

अयोध्या- अयोध्येतील राम मंदिर जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सीईओ) घोषणा झालेली आहे. मंदिराच्या संपूर्ण व्यवस्थापनाची धुरा सांभाळण्यासाठी भारतीय हवाई दलाचे माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच तीन नव्या विश्वस्तांनाही ट्रस्टच्या संचालक मंडळात स्थान देण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत राममंदिरातील देणगी चोरीच्या आरोपांनंतर सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला होता. तसेच विमलेंद्र मोहन यांच्या निधनानंतर ट्रस्टमधील तीन पदे रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर पारदर्शक कारभारासाठी आणि मंदिर व्यवस्थापनाला कॉर्पोरेट आणि तांत्रिक शिस्त आणण्यासाठी तीन जणांची विश्वस्तपदी निवड झाली आहे.

जितेंद्र मिश्र माजी फायटर पायलट आहेत. त्यांनी भारतीय हवाई दलात ३९ वर्षे सेवा दिली आहे. जानेवारी २०२५ मध्ये जितेंद्र मिश्र यांनी वेस्टर्न एअर कमांडची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली. भारतीय हवाई दलाच्या सर्वाधिक गरजेच्या ऑपरेशनल कमांडमध्ये वेस्टर्न एअर कमांडचा समावेश होतो. काही महिन्यांनंतरच त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान कमांडचं नेतृत्व केलं. या ऑपरेशनच्या अंतर्गत भारतीय हवाई दलानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ जमीनदोस्त केले.

तीन नव्या विश्वस्तांचा परिचय

महेश भागचंदका – ‘M2K फाऊंडेशन’चे अध्यक्ष आणि अशोक सिंघल फाऊंडेशनचे विश्वस्त. त्यांनी दिवंगत संघनेते अशोक सिंघल यांच्यावर पुस्तक लिहिले असून, दरवर्षी कारसेवक पुरममध्ये अपंगांना सायकली वाटप करणे आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असतो.

मदन मोहन पांडे – स्थानिक न्यायालयात राम जन्मभूमी खटल्याच्या सुनावणीदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणारे वकील आणि विश्व हिंदू परिषेशी निगडीत कार्यकर्ते.

निर्मल यादव – ओबीसी (OBC) समाजातील प्रतिनिधी म्हणून त्यांना ट्रस्टमधील विश्वस्तपदी संधी देण्यात आली आहे.

या तीन नव्या निवडींमध्ये सामाजिक आणि जातीय समीकरणांचाही विचार करण्यात आला असून, राममंदिर आंदोलनात योगदान देणाऱ्या ब्राह्मणासह इतर मागासवर्गीय (OBC) समाजाला यात प्रतिनिधित्व मिळाले आहे.