ब्रेकिंग न्यूज

चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक दुबार मतदार तर भोसरी सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ 

Share

पुणे – मतदारांच्या विशेष सखोल पडताळणी कार्यक्रमामुळे (एसआयआर) पुणे जिल्ह्यातील मतदारसंख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी सोमवारी प्रसिद्ध झाली असून, त्यानुसार चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक दुबार मतदार तर भोसरी सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ ठरला आहे. 

पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी चिंचवड आणि हडपसर हे सर्वाधिक मतदारसंख्या असलेले मतदारसंघ होते. मात्र, विशेष सखोल पडताळणी कार्यक्रमांतंर्गत प्रारूप यादीत त्यांना मागे टाकून भोसरी सर्वांत मोठा मतदारसंघ ठरला आहे. भोसरीमध्ये चार लाख ६१ हजार ९३४ मतदार आहेत. त्यापाठोपाठ चिंचवडमध्ये चार लाख १७ हजार ७१५ मतदार आहेत.

पुरुष मतदारांच्या बाबतीत भोसरीत सर्वाधिक दोन लाख ४३ हजार ३१५, तर महिलांच्या बाबतीतही भोसरीतच सर्वाधिक दोन लाख १८ हजार ५३६ मतदार आहेत. शिवाजीनगरमध्ये पुरुष (७९,२४२) आणि महिला (८४,००२) मतदारांची संख्या सर्वांत कमी आहे.

पुण्याची मतदारसंख्या ६२ लाख १३ हजार ६९२ इतकी झाली आहे. यापूर्वीच्या मतदारयादीच्या तुलनेत २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांचा प्रारूप यादीत समावेश झालेला नाही. प्रारूप यादीतील मतदारांमध्ये ३१ लाख ५१ हजार २९७ पुरुष, ३० लाख ६२ हजार १२ महिला आणि ३८३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.