पुणे- पुण्यात एका महाभागाला नवीन कार घेतल्याचे सेलिब्रेशन चांगलेच महागात पडले आहे. नवीन कार खरेदी केल्यानंतर तिचे महामार्गावर फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. हे फोटोशूट आणि व्हिडिओ व्हायरल होताच महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी की, 27 ऑगस्ट रोजी सोमनाथ अशोक केदारी यांनी शोरूममधून नवी कोरी गाडी खरेदी केली. नव्या गाडीचे मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात स्वागत करण्यात आले. गाडी वाहून नेण्यासाठी एका कंटेनरची व्यवस्था करण्यात आली होती. या कंटेनरवर नवी कोरी गाडी ठेवण्यात आली होती. त्यानंतर ही गाडी पुणे-बंगळुरू महामार्गावरून नेण्यात आली.
या गाडीच्या अवतीभोवती मित्रांची वाहने होती, तर पुढे फॉर्च्युनर कार होती. या वाहनांच्या ताफ्यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती. दुसरीकडे, या संपूर्ण सोहळ्याचे ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात येत होते. नव्या गाडीचे फोटो आणि व्हिडिओ काढून त्याची सोशल मीडिया रील तयार करण्यात आली.
ही रील सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक महामार्गावर वाहनांचा ताफा उभा करून किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने फोटो आणि व्हिडिओ शूट करणे कितपत योग्य आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला.
सोशल मीडियावरील व्हायरल रील पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर बावधन पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन तपास सुरू केला. पोलिसांनी या रीलशी संबंधित व्यक्तींचा शोध घेतला. त्यानंतर फॉर्च्युनर कारचा चालक सोमनाथ अशोक केदारी तसेच फोटोग्राफर अजय संभाजी यादव यांना ताब्यात घेण्यात आले. यासोबतच शूटिंगमध्ये वापरण्यात आलेली फॉर्च्युनर कार आणि नवी कोरी गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
