ब्रेकिंग न्यूज

‘कमिशनरला बोलवा… मी इथेच आहे..’पिंपरी चिंचवडमध्ये मद्यधुंद तरुणाची पोलिसांना शिवीगाळ, नंतर सोशल मीडियावर माफी

Share

पिंपरी – मद्यधुंद तरुणाने बेफाम वाहन चालवून, वाहनाला धडक दिल्यानंतर गाडी थेट डिव्हायडरला ठोकली. पोलीस घटनास्थळी येताच पोलिसांनाच अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार औंध-हिंजवडी बीआरटी मार्गावर घडला. 

शशांक प्रशांत खानवलकर असे या मद्यधुंद कार चालकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शशांक आपली कार घेऊन दारूच्या नशेत भरधाव वेगात निघाला होता. एका वाहनाला धडक दिल्यानंतर त्याची गाडी थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली. या घटनेनंतर वाकड पोलिसांनी त्याला अडवत, वेगाने वाहन चालवू नये, अशी समज देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, दारूच्या नशेत असलेल्या शशांकने ‘मी मराठी आहे… तुम्हाला लाज वाटते का?’ असे म्हणत पोलिसांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना अश्लील शिवीगाळ केली. ‘तुमच्या कमिश्नरला बोलवा, मी इथेच आहे’, अशा शब्दांत त्याने पोलिसांना आव्हान दिले. व्हायरल व्हिडिओमध्ये शशांक पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

वाकड पोलिसांनी शशांक खानवलकरविरोधात कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला असून त्याला कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे. मात्र, या सगळ्या राड्यानंतर काही तासांत दारूची नशा उतरली आणि शशांकला आपल्या कृत्याची जाणीव झाली. त्याने व्हिडिओ तयार करून पोलिसांची जाहीर माफी मागितली.