ब्रेकिंग न्यूज

सहकारनगरमध्ये बेकायदा सावकारी करून कोट्यवधींची वसुली; तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल

Share

पुणे – कोणताही सावकारीचा वैध परवाना नसताना नागरिकांची आर्थिक पिळवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सहकारनगर परिसरात विनापरवाना सावकारी करून फिर्यादीकडून तब्बल १ कोटी १३ लाख ५० हजार रुपये वसूल केल्या उघडकीस आले आहे. हा प्रकार २०१५ ते २०१९ या कालावधीत घडला. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अॅड. गुरमितसिंग गुरनामसिंग होरा (५५), तरविंदरसिंग गुरनामसिंग होरा (५८) आणि गुरदिपसिंग जगतसिंग माखिजा (६३) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र सावकारी अधिनियमाच्या कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पंचवटी सोसायटी, पुणे-सातारा रस्ता, धनकवडी येथे हा प्रकार घडला. फिर्यादीच्या भावाकडून ६२ लाख रुपयांचे चेक बाऊन्सचे प्रकरण दाखल करून धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच साक्षीदार गणपत मगर यांच्याकडून २०१५ ते २०१९ या कालावधीत व्याजापोटी ४२ लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर ४७ लाख ५२ हजार रुपयांची चेक बाऊन्सची केस दाखल करण्यात आली. यासाठी खोटा समजुतीचा कबुलीजबाब तयार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप खंडागळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.