पुणे- पुण्यात अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाने जोरदार कारवाई सुरु केली असून दोन परदेशी नागरिकांसह आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.
विक्रम कालेकर (वय 30, रा. कर्जत, जि. रायगड), सिसे सादिओ ऊर्फ अॅलेक्स (वय 30, सेनेगलचा नागरिक, सध्या रा. डोंबिवली, जि. ठाणे) आणि जेले बियासमार्क (वय 30, किंगडम ऑफ इस्वातिनीचा नागरिक, सध्या रा. कर्जत, जि. रायगड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सिसे सादिओ ऊर्फ अॅलेक्स याच्याकडून 22 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), आठ मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. तर जेले बियासमार्क याच्याकडून 14 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाने दिली.
बाणेर पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक 201/2026 अंतर्गत 26 जून 2026 रोजी सुरुवातीला 98 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त करून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतरच्या तपासात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहारांचा मागोवा, तांत्रिक विश्लेषण आणि अंमली पदार्थ पुरवठा साखळीच्या तपासातून अंमली पदार्थ विरोधी पथकाने आणखी तीन महत्त्वाच्या आरोपींपर्यंत पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणातील टोळीचे स्थानिक वितरण जाळे, आर्थिक व्यवहार तसेच संभाव्य आंतरराष्ट्रीय संबंध उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवनासंबंधी कोणतीही माहिती असल्यास संबंधित यंत्रणेला कळवावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि तपशील गोपनीय ठेवले जातील असे आवाहन अंमली पदार्थ विरोधी पथकाने नागरिकांना केले आहे.
