ब्रेकिंग न्यूज

पुण्यात २०० मंडळे डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करणार, पुनीत बालन यांची माहिती 

Share

पुणे – डीजे तसेच मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीमच्या वापरावरून पुण्यात सध्या गणेश मंडळे आणि पोलीस यांच्यात वाद रंगला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एक सकारात्मक बातमी अशी आहे की २०० पेक्षा अधिक गणेश मंडळानी यंदा डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना बालन यांनी सांगितले की, पुण्याच्या गणेशोत्सवाची पारंपरिक आणि सांस्कृतिक ओळख जपणे, तसेच ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.“गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही अनेक गणेश मंडळांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील २०० हून अधिक मंडळे या उपक्रमात सहभागी झाली आहेत” पुण्याच्या गणेशोत्सवाचे पारंपरिक स्वरूप कायम ठेवावे आणि उत्सवामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, ही आमची भूमिका असल्याचे बालन यांनी सांगितले.

दुसरीकडे गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात डीजे वाजवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्सवाशी संबंधित घटक निर्बंध शिथिल करण्याची मागणी मंडळाकडून केली जात आहे. मात्र पुणे पोलिसांनी निर्धारित ध्वनीमर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या साउंड सिस्टीमना परवानगी मिळणार नाही हे ठामपणे सांगितले आहे.

डीजे विरुद्ध बोलणाऱ्या नागरिकाला सभागृहाबाहेर काढले 

पुणे महानगरपालिकेत गणेशोत्सव साजरा करण्याच्या संदर्भात झालेल्या बैठकीत नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी विद्याधर बापट यांनी गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या. उत्सवाच्या दहा दिवसांत लाऊडस्पीकरचा आवाज आणि विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा दणदणाट यामुळे नागरिकांना त्रास होतो. त्याचबरोबर रस्त्यांवर मंडप उभारल्याने वाहतुकीची समस्याही निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.

त्यावरून त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. नागरिकांचा आवाज दडपणे हे लोकशाही विरोधी असल्याचे मत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले. याबाबतचे पत्र त्यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे दिले.

मागील वर्षी सोलापूर येथे सर्वपक्षीय नेत्यांनी डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करून एक चांगला आदर्श निर्माण केला होता. त्याच धर्तीवर पुण्यात सुद्धा डीजे आणि लेझरमुक्त गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन वेलणकर यांनी केले आहे.