ब्रेकिंग न्यूज

तो अपघात नव्हे तर खून ; विवाहितेची प्रियकराने ताम्हिणी घाटात नेऊन केली हत्या

Share

पुणे- ताम्हिणी घाटात कोंडेथर गावाच्या हद्दीत मंगळवारी दुपारी एका ३० वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह झुडपात आढळून आला होता. प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे दिसून येत होते. मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. रायगड स्थानिक गुन्हे शाखा आणि माणगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीना जेरबंद केले. 

ही हत्या तिच्याच प्रियकराने आपल्या चुलत भावाच्या मदतीने केल्याचं उघड झाले असून या प्रकरणी पोलिसांनी दुर्गाप्रसाद प्रजापती (वय २४) आणि त्याचा चुलत भाऊ दिनेशकुमार प्रजापती (वय २७, दोघेही रा. पिंपरी-चिंचवड) या दोघांना अटक केली आहे. सुमन गोपाळ यादव (वय ३०, रा. चिखली, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गाप्रसाद याचे सुमनसोबत अनैतिक संबंध होते. सुमनचा पती उत्तर प्रदेशातील एका गुन्ह्यात चार महिने तुरुंगात असताना या दोघांचे सूत जुळले. दोघांचे मागील काही महिन्यांपासून अनैतिक संबंध सुरू होते.

दरम्यान, पती तुरुंगातून सुटून आल्यानंतर सुमन दोन महिन्यांपूर्वी दुर्गाप्रसादसोबत चिखली येथे राहण्यास आली. मात्र, काही दिवसांनंतर तिने आपल्या दोन लहान मुलांनाही सोबत आणण्याचा आणि त्यांची जबाबदारी स्वीकारण्याचा तगादा दुर्गाप्रसादकडे लावला. मात्र मुलांचं संगोपन करण्यास दुर्गाप्रसादचा नकार होता. याच वादातून तिचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. यासाठी आरोपीनं आपल्या चुलत भावाला देखील या कटात सामील करून घेतलं.

दोघांनी फिरण्याच्या बहाण्याने तिला कारमध्ये बसवले आणि कारमध्येच तिची ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. हत्येनंतर आरोपींनी सुमनचा मृतदेह ताम्हिणी घाटातील झुडपात फेकून दिला. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास स्थानिकांना मृतदेह दिसल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अहवालात गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेने मोबाईल टॉवर डंप डेटा आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढला आणि २४ तासांत आरोपींना जेरबंद केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, माणगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.