शिक्रापूर- इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर प्रेमाचे नाटक करून तरुणाला भेटायला बोलावले. त्यानंतर त्याला डांबून त्याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करून एका तरुणीसहित तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
शीतल संजय डाके, वैष्णवी आकाश गायकवाड, आकाश चिंतामण गायकवाड आणि शुभम कांडगे अशी अटक केल्या आरोपींची नावे आहेत. शिक्रापूर पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सुरज चंद्रकांत वारे (वय २३ रा. वडगाव शेरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
सुरज याची शीतल डाके व वैष्णवी गायकवाड नावाच्या आयडी वरून इंस्टाग्राम वरून ओळख झाली.वैष्णवी हिने त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडे ऑनलाईन पैसे मागितले. त्यानंतर तुला हवे ते देईन असे सांगून त्याला २३ ऑगस्ट रोजी चाकण चौक शिक्रापूर येथे बोलावून घेतले. सुरज त्याठिकाणी येताच आरोपींनी संगनमत करून त्याला पकडले आणि जबरदस्तीने जवळच असलेल्या एस टी बस स्थानकात नेले. त्याठिकाणी त्याचा मोबाइल, पैसे आणि एटीएम कार्ड काढून त्याला डांबून ठेवले. “आम्हाला ५० हजार रुपये दे अन्यथा तुझ्याविरोधात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करू” अशी धमकी दिली.
दरम्यान हा प्रकार सुरु असताना त्या ठिकाणी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे रात्र गस्ती पथक त्याठिकाणी आले. पोलिसांना हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे सर्वाना घेऊन पोलीस ठाण्यात आणले. सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
