ब्रेकिंग न्यूज

जेलमध्ये भेटले, सायबर क्राइमचा प्लॅन आखला आणि ज्येष्ठाचे ८५ लाख लुबाडले

Share

पुणे- सायबर गुन्ह्यात तब्बल दीड वर्षे न्यायालयीन कोठडीत राहिलेल्या आरोपीसोबत येरवडा कारागृहात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी एका ज्येष्ठ नागरिकाला शेअर बाजारात पैसे गुंतवून मोठा फायदा मिळण्याचे आमिष दाखवून तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक केली.

या गुन्ह्याचा तपास करत असताना फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यापैकी १४ जुलै २०२६ रोजी पाच लाख रुपये तेजस ज्ञानोबा लोखंडे याच्या इंडसइंड बँकेतील एका खात्यात जमा झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तेजस लोखंडे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. हिंजवडी पोलीस ठाण्यातील अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत असताना त्याची येरवडा कारागृहात अविनाश ज्ञानोबा बाकलीकर याच्याशी ओळख झाली होती अशी माहिती तेजस याने पोलिसांना दिली. अविनाश बाकलीकर हा यापूर्वी सायबर पोलीस ठाण्यातील गुन्हात अटक झालेला असून, त्या गुन्ह्यात तो सुमारे दीड वर्षे न्यायालयीन कोठडीत होता.

तेजसने कारागृहात असतानाच सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती मिळविण्याचे नियोजन केल्याची माहिती तपासात समोर आली. जामिनावर बाहेर आल्यानंतर अविनाश बाकलीकर याच्या सांगण्यावरून तेजसने बँक खाते उघडून ते त्याच्याकडे दिल्याचे पोलिसांना सांगितले. अविनाश बाकलीकर हा जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा सायबर गुन्ह्यांसाठी साथीदारांचे जाळे उभे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला लातूर येथून ताब्यात घेतले.