पिंपरी- निगडी प्राधिकरण परिसरात चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकमान्य हॉस्पिटलजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
अमोल शिंदे (वय 20) आणि मनोज शिंदे (वय 26) अशी मृत्यू झालेल्या दोन्ही कामगारांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी की काल बुधवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास हे दोन कामगार चेंबरमध्ये अडकल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी (Pimpri Chinchwad) अथक प्रयत्नांनंतर दोघांनाही चेंबरमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिले.
दरम्यान, या कामगारांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चेंबरमध्ये विषारी वायू किंवा ऑक्सिजनची कमतरता यांसारख्या कारणांची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
निगडी प्राधिकरणात गेल्या वर्षीही अशाच प्रकारे चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा दुर्दैवी अंत झाला होता. पुन्हा अशाच प्रकारची दुर्घटना घडल्यानं प्रशासनानं या धोकादायक चेंबरबाबत योग्य ती खबरदारी घेतली होती का? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. एवढी मोठी दुर्घटना घडूनही महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी यातून कोणताही धडा घेतला नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
