पिंपरी -एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ५९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मदतीचा बहाणा करत एका भामट्याने त्यांचे एटीएम कार्ड हातचालाखीने बदलले आणि ३० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना खराबवाडी येथे घडली आहे.
या प्रकरणी जितेंद्र कुमार रामजी तिवारी (वय ५९, रा. खराबवाडी, मूळ रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एका अनोळखी इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी तिवारी हे बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले असताना मशीनमधून पैसे निघत नव्हते. मागे उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने त्यांना बॅलन्स चेक करण्यास सांगितले. तिवारी पावती घेत असताना आरोपीने जमिनीवर कार्ड पाडल्याचे भासवून हातचालाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलले आणि गुप्त पिन क्रमांक पाहून खात्यातून ३० हजार रुपये काढून पोबारा केला.
