पिंपरी- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी, (दि. २९ ऑगस्ट) सायं. ५ वाजता, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे रंगणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, या सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष मा. अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, आमदार अमित गोरखे, मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शहराध्यक्ष योगेश बहल आदींसह कला, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पुरस्काराचे स्वरूप रु. १,११,०००/- (एक लाख ११ हजार रुपये) रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यात मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रंगणार आहे. यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या सुरेल आवाजाची छाप उमटविणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या सदाबहार गीतांची मैफल रसिकांना अनुभवता येईल. हा संपूर्ण सोहळा सर्व संगीतप्रेमी व नागरिकांसाठी विनामूल्य आहे. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी प्रेक्षकांनी आसनस्थ व्हावे. पिंपरी चिंचवड शहर परिसरातील तमाम रसिकांनी या सांगीतिक व सांस्कृतिक मेजवानीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, यांनी केले आहे.

बुधवारी चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष किरण येवलेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र बंग, सहकार्य संतोष रासने, गौरी लोंढे, सह कोषाध्यक्ष संतोष शिंदे, सदस्य सुदाम परब आदी उपस्थित होते. नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या या प्रतिष्ठित आशा भोसले पुरस्कारासाठी स्वतंत्र निवड समिती आहे. समितीमध्ये ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. रवींद्र घांगुर्डे, वंदना घांगुर्डे, दिलीप काटकर, राजेशकुमार साकला आणि भाऊसाहेब भोईर यांचा समावेश आहे.
सन २००२ पासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेतर्फे हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार दिला जातो. यापूर्वी हा सन्मान गानकोकिळा स्व. लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, डॉ. सलील कुलकर्णी आणि शान (शांतनू मुखर्जी) यांसारख्या संगीतातील दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे.
