पुणे – दारू पिऊन झालेल्या वादातून एका महिलेने दगडाने डोक्यात व छातीत मारून एकाची निर्घृण हत्या केली. ही घटना रविवारी सात वाजण्याच्या सुमारास कासारसाई- कूसगाव रस्त्यावरील कृष्ण मंदिरापुढील वन विभागाच्या जागेत घडली.
हनुमंत सोपान शितोळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी मयूर शितोळे (३०, कासारसाई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जयवंता भगवंत तिडके (५०, कासारसाई) या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मृत हनुमंत शितोळे आणि आरोपी जयवंता हे दोघे कासारसाई येथे दारू पीत होते. दारू प्यायल्यानंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. या भांडणात हनुमंत यांनी जयवंताला मारहाण करून तिचा हात पिरगाळला. याचा राग आल्याने तिने तेथे पडलेला दगड उचलून हनुमंत यांच्या डोक्यात व छातीत जोराने मारला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
