पुणे- पुणे रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीजवळ एका रेल्वे कर्मचाऱ्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी चाकूने वार करून रोख रक्कम, सोन्याची साखळी व दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी डोंबिवली (पूर्व), ठाणे येथून तिघांना जेरबंद केले आहे.
जितेंद्र मोतीराम (२४, रा. जळगाव) आणि ईश्वर गोरख चव्हाण (२३, रा. संभाजीनगर), अजय मदन चव्हाण (३५, सध्या सर्व रा. खोली क्रमांक ४, मुंब्रादेवी चाळ, भोपरगाव कमानी, डोंबिवली पूर्व, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
केल्विन सोलोमन मायला हे पुणे रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत आहेत. रात्रीच्या वेळी तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांकडून वसूल केलेली दंड आणि तिकीटाची रक्कम कार्यालयात जमा करण्यासाठी जात असताना आरोपींनी त्यांना गाठले. गळ्याला चाकू लावून मारहाण केली आणि झटापटीत उजव्या हातावर वार केले. लुटमार केल्यानंतर त्यांचे हात-पाय बांधून व तोंडात रुमाल कोंबून आरोपी पसार झाले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी आरोपींच्या अटकेसाठी दोन तपास पथके तयार केली. तपासादरम्यान पुणे रेल्वे स्थानकापासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरापर्यंतच्या सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यातून आरोपींचे फोटो मिळवून त्यांची ओळख पटविण्यात आली. तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रकाश आव्हाड आणि सारस साळवी यांना आरोपी भोपरगाव कमानी, डोंबिवली (पूर्व) येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बंडगार्डन पोलिसांनी पुणे आरपीएफच्या पथकासोबत संयुक्त कारवाई करून २१ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडून फिर्यादीकडून चोरी केलेली रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २५ ऑगस्ट २०२६पर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त सचिन दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद सलगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, निलेश पालवे, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक आणि ज्ञानेश्वर गायकवाड तसेच पुणे आरपीएफचे पोलीस अंमलदार आण्णासाहेब पाखरे, स्वप्नील धनसेर आणि युवराज गायकवाड यांनी कारवाई यशस्वी केली.
