सातारा- पर्यटकांचे आकर्षण असलेले जगप्रसिद्ध कास पुष्पपठार १ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुले होणार आहे त्यासाठी वनविभाग सज्ज झाला असून फुलांच्या बहरासोबतच यंदा पर्यटकांना निसर्गाचा नवा अनुभव देणारे आकर्षक पॉइंटही विकसित करण्यात आले आहेत.
वनविभाग आणि कास समितीच्या पुढाकारातून गेल्या काही दिवसांपासून पठारावर विविध विकासकामे हाती घेण्यात आली होती. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली असून, पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक सौंदर्याशी सुसंगत पद्धतीने उभारण्यात आलेल्या या सुविधांमुळे कासच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
कास परिसराचे वैभव असलेल्या गवा, बिबट्या, हरिण, सांबर, मोर, माकड, वानर आदी वन्यजीवांच्या प्रतिकृती स्वागत कमानीजवळ उभारण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक साहित्य आणि नैसर्गिक देखणेपण जपून करण्यात आलेल्या या कामांमुळे पर्यटकांना कासच्या निसर्गाची अधिक जवळून अनुभूती घेता येणार आहे.
