ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील दोन महिला पोलीस एकमेकींच्या प्रेमात पडल्या, रविवारी विवाहबद्ध होणार !

Share

पुणे- पुण्यातील दोन महिला पोलीस एकमेकांच्या प्रेमात पडल्या असून या दोघीनी रविवारी ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याची तयारी केली आहे. या प्रकारची पिंपरी- चिंचवड पोलीस दलामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

याबाबतची माहिती अशी की, पोलीस भरतीच्या काळात दोघींची ओळख झाली. त्यानंतर दोघींची पोलीस शिपाईपदावर नेमणूक झाली. प्रशिक्षणानंतर काही काळ दोघी मुख्यालयात नियुक्त होत्या. त्याच काळात त्या इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत एकाच ठिकाणी वास्तव्यास होत्या. यानंतर शहरातील मध्यवर्ती भागातील एकाच पोलीस ठाण्यात दोघींची नियुक्ती झाली. कालांतराने त्यांच्यातील जवळीक वाढत गेली आणि दोघींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

आता या दोघीनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असून दोघींनी समलैंगिक विवाहासाठी सुट्टीचा अर्ज केला आहे. येत्या रविवारी ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने दोघीजणी विवाहबद्ध होणार आहेत. कुटुंबीयांनी या विवाहाला विरोध करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतल्याचे समजते आहे. मात्र, हा दोघींच्या वैयक्तिक आयुष्याचा विषय असल्याने पोलिसांनी विवाह रोखण्यास नकार दिला असून त्याऐवजी आवश्यक असल्यास समुपदेशन करण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.

या दोघींपैकी एका महिला पोलिसाने लिंगबदलाशी संबंधित वैद्यकीय उपचार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी गेल्याचे सांगितले जात आहे.