पुणे- पीएमपीएलच्या बसमधून एक तरुणी तोल जाऊन खाली पडली आणि पाठीमागून आलेल्या स्कुल बसच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. ही घटना आज, सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोडवर ब्रह्मा हॉटेल समोर घडली.
कांचन खड्डा (वय २५, रा. कृष्णा हॉस्टेल, गिरीनगर, खडकवासला, मूळ रा.राजस्थान) असे मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानापूर ते स्वारगेट ही बस खानापूरहून स्वारगेटकडे जात होती. बसमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. ही तरुणी बसच्या पुढील दारात उभी होती. तिला पुढे सरकायला जागा नव्हती. बस सुरू असताना ती अचानक बसमधून तोल जाऊन खाली पडली. त्याचवेळी पाठीमागून स्कूल बस येत होती. खाली पडलेल्या या तरुणीच्या अंगावरून स्कूल बसचे उजव्या बाजूचे मागचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघातानंतर सिंहगड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बसचालक यांना ताब्यात घेण्यात आले असून मेडिकलसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
