पुणे- व्याकरणतज्ज्ञ प्राध्यापिका यास्मिन शेख यांचं आज (दि. २४) निधन झालं. वयाच्या १०१ व्या वर्षी पुण्यातील वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी भाषेचा गाढा अभ्यासक हरपला अशी भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.
यास्मिन शेख यांचा जन्म २१ जून १९२५ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव जेरुषा रुबेन असे होते. त्या जन्माने ज्यू होत्या. अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. विवाह केल्यानंतरही यास्मिन यांनी धर्म बदलला नाही. प्रा. यास्मिन शेख या मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका आणि शिक्षिका होत्या.
त्यांच्या वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे बालपणापासूनच त्यांना विविध ठिकाणी राहण्याची संधी मिळाली आणि शिक्षणाची गोडी निर्माण झाली. त्यांनी पुण्यातील एस.पी. कॉलेजमधून बी.ए. केले. मराठी विषयात त्यांची विशेष गुणवत्ता होती. प्रा. एस. एम. माटे आणि प्रा. के. एन. वाटवे यांसारख्या शिक्षकांचा त्यांच्या भाषाविषयक जडणघडणीवर प्रभाव पडला. पुढे त्यांनी एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. यास्मिन शेख यांनी औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात अध्यापन केले. त्यानंतर मुंबईतील एसआयईएस कॉलेज, शीव येथे मराठीच्या प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ काम केले. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.
